ठाणे - संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यातच गेल्या काही दिवसांत मीरा भाईंदर शहरातील सरकारी, तसेच खासगी रुग्णालयांना कोविड-१९ या विषाणूवरील रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे, अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून १० मे पर्यंत भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले.
हेही वाचा - ठाणे : जनावरांची चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्लांट उभारणार
मिरा भाईंदर शहरात ऑक्सिजनची कमतरता सुरू असल्यामुळे आयुक्त दिलीप ढोले व आमदार गीता जैन यांनी त्याची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून मिरा भाईंदर शहरात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी २३ एप्रिल रोजी आमदार गीता जैन यांनी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे भेट घेतली. याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी मंजूर केला असल्याची माहिती जैन यांनी दिली. यावेळी प्लांट उभारण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून १० मे पर्यंत भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी पालिका प्रशासनाला दिले.
हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर २०० रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येईल. या प्रकल्पातून १७५ जम्बो सिलिंडर भरतील एवढा ऑक्सिजन निर्माण करता येणार आहे. एका मिनिटात ८१० लिटर ऑक्सिजनचे उत्पादन करता येणार आहे. हा ऑक्सिजन अखंडितपणे निर्माण करता येणार असल्यामुळे रुग्णांना अखंडितपणे ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. त्यामुळे, ऑक्सिजनची समस्या दूर होणार आहे. त्यामुळे, रुग्णांवर उपचार करण्यास चांगली मदत होणार आहे, असे आमदार गीता जैन यांनी सांगितले.
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राची रिकव्हरी टक्केवारी समाधानकारक
मीरा भाईंदर शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यातच पालिका रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे. मात्र, शहरातील रुग्णांना ऑक्सिजनची कमी पडू देणार नाही. त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. १०० जम्बो सिलेंडर, तर आठ ड्युरा सिलेंडर शहरात दाखल झाले आहेत. शहरातील सर्व कोविड मान्यता रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राची रिकव्हरी टक्केवारी समाधानकारक आहे, अशी माहिती पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
हेही वाचा - नवी मुंबईत ई-पास शिवाय खासगी गाड्यांना प्रवेश प्रतिबंधित