ठाणे - आज रविवारीची सकाळ ठाणेकरांसाठी अत्यंत सुखद होती. एकीकडे शेकडो सुपर बाईक्स बघण्याचा थरार तर दुसरीकडे आपल्या लाडक्या कलावंतांचे दर्शन. गेल्या रविवारी व्हिंटेज आणि सुपर कार्सच्या दिमाखदार रॅलीचा आनंद लुटणाऱ्या ठाणेकरांना आज जवळपास ३०० सुपर बाईक्सचा अनोखा नजराणा अनुभवता आला. हार्ले डेव्हिडसन, डुकाटी, बीएमडब्ल्यू, यामाहा, रॉयल एन्फिल्ड, निंजा, कावासाकी, अप्रिलिया अशा अनेक आकर्षक बाईक्स पाहायला मिळाल्या. निमित्त होते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे.
सकाळी ८ वाजता ठाणे शहरातील कोर्ट नाका परिसरातून सुपर बाईक्सच्या संचलनाला सुरुवात होऊन, संपूर्ण शहराची परिक्रमा करून रॅलीची सांगता कोर्टनाका येथे झाली. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या संचलनासाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी सहपोलीस आयुक्त श्री सुरेश मेखला, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, अभिनेते मकरंद अनासपूरे आणि माझ्या नवऱ्याची बायको मालिका फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांची उपस्थिती होती. वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्वतः एक परदेशी गाडी चालवून आपला सहभाग नोंदवला. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षीत रहावे असे आवाहन माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी यावेळी केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त महिनाभर कार्यक्रम
रस्ता सुरक्षा सप्ताह हा 7 दिवसांचा असतो, मात्र यावर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त महिनाभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बाईक रॅली, कार रॅली अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांद्वारे वाहतुकीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.