नागपूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नागपूर येथं झालेल्या संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमात संविधाची प्रत उंचावून संविधानाचं महत्त्व विषद करण्याचा प्रयत्न केला, असा दावा काँग्रेस नेते करत आहेत. मात्र, राहुल गांधीच्या सभेत वाटण्यात आलेल्या संविधानाच्या प्रत कोऱ्या होत्या. त्यामुळं राहुल गांधीचे संविधान प्रेम हे बेगडी असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्यावरून पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला. तर दुसरीकडं भाजपानं ही जश्यात तसं उत्तर दिलं.
राहुल गांधींनी संविधानाची अवहेलना केली : संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमात राहुल गांधी आले होते, त्यांनी संविधानाचे लाल पान असलेलं पुस्तक आणि आतमध्ये मजकूर नसलेलं, कलम आणि आर्टिकल्स नसलेल्या संविधानाच्या प्रत वाटल्या. मी यापूर्वी संविधानाची अशी प्रताडणा व अवहेलना आपल्या आयुष्यात पाहिली नसल्याचं भाजपाचे उपाध्यक्ष धर्मापाल मेश्राम यांनी सांगितलं. "संविधानाच्या प्रस्ताविकेवर चक्क निमंत्रण पत्रिका छापण्यात आली. एवढंचं नाही, तर त्यावर राहुल गांधीचा फोटो ही छापण्यात आला. खरंतर संविधानाचा हा अपमान आहे. अशा पद्धतीच्या संविधानाचा अपमान या देशातली व राज्यातील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारी जनता सहन करणार नाही.", असा घणाघात धर्मापाल मेश्राम यांनी केलाय.
आयोजकांनी स्पष्टीकरण द्यावं : "जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत. ज्या संस्थांनी ज्या ज्या लोकांनी त्यांच्या या कार्यक्रमाला समर्थन दिलं त्यांनी देखील या संदर्भातली स्पष्टीकरणं समाजाला दिलं पाहिजे," अशी मागणी धर्मपाल मेश्राम यांनी केली.
लाल रंगाची भाजपाला एवढी चीड का? : "राहुल गांधी देशभरात जाऊन संविधान संमेलन घेत आहेत. त्यांच्या या कार्यक्रमामुळं भाजपा बेचैन झाला आहे. हिंदू धर्मात देवी मातेचा रंग लाल आहे, सूर्याचा रंग लाल आहे, सूर्य उगवतो तेव्हा त्याचा रंग लाल असतो. फडणवीस यांना लाल रंगाची अडचण का? देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत झाला असल्यानं ते नैराश्यानं ग्रासले आहेत," असा टोला भुपेश बघेल यांनी लगावला.
संविधानाच्या रंगाचं राजकारण : 6 नोव्हेंबरला उपराजधानी नागपूरात काही संघटनांनी संविधान सन्मान संमेलनाचं आयोजन केलं होतं. ज्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. संविधान सन्मान संमेलनात लाल अक्षरांनी प्रिंट असलेल्या संविधानाच्या प्रत वाटण्यात आल्या. पण ज्या प्रत वाटण्यात आल्या. त्या आतून पूर्णतः कोऱ्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा लावून धरला आणि इथून या वादाला तोंड फुटलं.
संविधान, लाल, निळा, अर्बन नक्षल : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार हळूहळू शिगेला जाताना दिसतोय. प्रचाराच्या अगदीचं केंद्रस्थानी असलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान. कधी लाल तर कधी निळ्या अक्षरांवरून सुरू झालेला मुद्दा आता शहरी नक्षलवादी (अर्बन नक्षलवाद) पर्यंत येऊन पोहोचला असताना आत्ता त्याही पुढं जात आता राजकीय पक्षांनी या शहरी नक्षलवादास कोण खतपाणी घालतयं, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.
हेही वाचा