पुणे : विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यावेळेस मी प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्याचं आंदोलन केलं, त्यावेळी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढल्याच्या प्रकरणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलानं माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. तसंच महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हाचे होल्डिंग जर बघितले, तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना वाईट वाटेल म्हणून हिंदुहृदयसम्राट हे नावचं काढून टाकलं होतं, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
महाराष्ट्र असा कधीच नव्हता : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे बोलत होते. "या राज्यात पाच वर्षांत जे राजकारण झालं ते कधीचं कोणी पाहिलं नसेल. या फोडाफोडीच्या राजकारणाचे संत शरद पवार असून त्यांनी जाती-जातीत भेदभाव करायला शिकवलं. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. राज्यातील जनतेसाठी माझी काही स्वप्न आहेत. आजपर्यंत सगळ्यांना सत्ता दिली, मला एकदा राज्याची सत्ता देऊन बघा," असं आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केलं.
कसबा आणि कोथरूड महत्त्वाच्या जागा : "विधानसभेच्या प्रचाराला फार वेळ मिळाला नाही. जिथं जिथं शक्य होत, तिथं तिथं सभा घेत आहे. कसबा आणि कोथरूड महत्त्वाच्या जागा आहेत. माझ्यासाठी कसब्याच एक महत्त्व आहे, शिवसेनेतून बाहेर पडत मनसे पक्षाची स्थापना केली, त्याच्या आधी कसबा गणपतीचं दर्शन घेतलं होतं. कसबा गणपतीचा एक इतिहास आहे. कसबा गणपतीचं जीर्णोद्धार जिजाऊ माँ नं केलं. एवढा मोठा इतिहास आहे, पण आज राज्याची परिस्थिती काय आहे," असं राज ठाकरे म्हणाले.
गळ्यात हार घाला आणि मुख्यमंत्री करा : "2019 मध्ये जेव्हा भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांनी निवडणूक लढवली, तेव्हा भाजप सेना यांच्याकडे स्पष्ठ बहुमत होत. पण त्यानंतर पहाटे एक शपथ विधी झालं आणि ते आर्ध्या तासात तुटलं. कारण काकांनी डोळे वर केले. मग काय झालं ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत शिवसेना गेली आणि माझ्या गळ्यात हार घाला आणि मला मुख्यमंत्री करा असं झालं. पण यात आपण ज्यांना मत दिलं त्यांचं काय? अडीच वर्ष मुख्यमंत्री घरीचं राहिले आणि टांग्याखालून सत्तेतील 40 आमदार निघून गेले," अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. नंतर एक वर्षानं तेच अजित पवार मांडीवर येऊन बसले. त्यानंतर तीच व्यक्ती महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री बनली.", अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.