ठाणे- "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणी प्रमाणे एक चिमुरडा वाचल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्याच्या तळाशी जावूनही या चिमुरड्याला नागरिक व डॉक्टरांच्या तत्परतेने जीवनदान मिळाले आहे. ही घटना अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे नव्याने सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी घडली आहे.
निखित बंसल असे (वय.१) असे चिमुरड्याचे नाव आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे नव्याने बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी चिमुरड्याचे आई-वडील मजुरीचे काम करतात. सध्या या बांधकामासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. अश्याच एका खोदलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात खेळता खेळता निखित पडला होता. निखित पाण्यात पडल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित त्याला खड्ड्यातील साचलेल्या पाण्याबाहेर काढत लगतच असलेल्या डॉ.बी.जी. छाया उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. श्रुतिका भालेराव यांनी प्राथमिक उपचार करून त्याच्या नाका तोंडा वाटे शरीरात गेलेले पाणी काढून त्याला कृत्रिम श्वास दिले. वेळीच उपचार मिळाल्याने निखितचा जीव वाचला. दरम्यान, पुढील उपचारासाठी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आज सांयकाळी निखितला घरी सोडण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
हेही वाचा- मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही एसआरए योजनेत ३०० चौरसफुटांचे घर - जितेंद्र आव्हाड