नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक भाजीपाला आणि फळ बाजारात असलेल्या पदपथावर हॉटेल, ज्यूस सेंटर आणि पानटपऱ्या अनधिकृतपणे चालविल्या जात आहेत. यातच समिती परिसरात उभा असलेला एक टेम्पो एका कर्मचाऱ्याकडून अचानकपणे सुरू झाल्याने, मार्केट परिसरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गेला. यात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यातील कलामउद्दीन खान या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
फळ व भाजीपाला बाजारात महाराष्ट्र तसेच परराज्यातून येणाऱ्या गाड्यांना तसेच पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून, अपघात घडत आहेत. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक नागरिकांची, वाहनांची ये-जा सुरू असते. बाजार परिसरात फुटपाथवर असणाऱ्या लक्ष्मी विलास हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी अशोक कुमार प्रसाद, अनिल कुमार प्रजापती, कलामउद्दीन खान, अखिलेश कुमार प्रजापती, हे चौघे पदपथावर गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांच्याच ओळखीचा एकजण पीकअप टेम्पो उभा करून गेला. मजामस्ती म्हणून अनिल कुमार प्रजापती हा टेम्पोमध्ये जाऊन बसला. दरम्यान, त्याच्याकडून अचानकपणे टेम्पो सुरू झाला आणि पदपथावर जाऊन धडकला. या घटनेत कलामउद्दीन व अखिलेशकुमार हे दोघेही गंभीर जखमी झाले. अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या अनिल कुमारने तेथून पळ काढला.
हेही वाचा - युवतीचा लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न; मोटरमनच्या सतर्कतेमुळे बचावला जीव, घटना सीसीटीव्हीत कैद
प्रत्यक्षदर्शीने जखमी अवस्थेतील दोघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी कलामउद्दीन याला मृत घोषित केले आहे तर, अखिलेश कुमारवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी अनिलकुमार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, अशा प्रकारे घडणाऱ्या अपघातांमुळे बाजार समितीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - तलावात पडलेल्या 'त्या' व्यक्तीचा मृतदेह अखेर सापडला