ठाणे - राज्यात सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात अडथळे येत आहेत. ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी ऑक्सिजन निर्मिती कारखान्यांना नवीन वीजजोडणी तसेच क्षमतावाढीसाठी वाढीव भार तातडीने देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्यानुसार महावितरणच्या कल्याण परिमंडलात अंबरनाथ एमआयडीसीतील मॉडर्न गॅस इंडस्ट्रीजला २४ तासातच आवश्यक सुविधा उभारून ५०-एचपी क्षमतेची नवीन औद्योगिक वीजजोडणी देण्यात आली. यातून कल्याण-डोंबिवली महापालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिका व परिसरातील कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन मिळण्यास मोलाची मदत ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
कंपनीकडून केली होती मागणी -
अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील मॉडर्न गॅस इंडस्ट्रीजकडून ऑक्सिजन निर्मितीच्या क्षमतावाढीसाठी ५०-एचपी क्षमतेच्या नवीन वीजजोडणीची मागणी करण्यात आली होती. यावर कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी तातडीने वीजजोडणी देण्याबाबत नियोजन केले. नवीन वीजजोडणीसाठी १५०-मीटर उच्चदाब व ३०-मीटर लघुदाब वीजवाहिनी तसेच-१००-केव्हीए क्षमतेच्या रोहित्र उभारणीचे काम करणे आवश्यक होते.
१२ ते १५ तासातच वीजजोडणी कार्यान्वित -
शुक्रवारी सकाळपासून युद्धपातळीवर काम सुरू करून रात्री दहा वाजता नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली. तातडीने वीजजोडणी मिळाल्याने मॉडर्न गॅस इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाने महावितरणचे आभार मानले आहेत. तर अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, कार्यकारी अभियंता अशोक सावंत, उप कार्यकारी अभियंता कलंत्री, सहायक अभियंता सुदर्शन कांबळे आणी त्यांच्या टीमने ही कामगिरी केली.