मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नकली आवाजाची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. या संदर्भात आमदार गीता जैन यांचे स्वीय सहाय्यकांच्या तक्रारीवरून १७ जुलै रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नवघर पोलिसांनी भाजपच्या एका महिला पदाधिकारीला अटक करून शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये एका महिलेच्या आवाजात कोरोना संदर्भात माहिती दिली आहे. ज्यामध्ये 'केंद्र सरकारकडून प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकेला दीड लाख रुपये देत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टर, प्रयोगशाळा, आरोग्य विभाग पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढण्यावर लक्ष देत आहेत. सर्दी ताप आला असेल तर सकारात्मक दाखवून त्यांना रुग्णालयात जबरजस्ती दाखल केले जात आहे. दीड लाख रुपये त्यांना मिळाले की, रुग्णाला घरी पाठवण्यात येते. त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे, तर आपण कोविड तपासणी करण बंद करा' असे आवाहन त्या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आले. आमदार गीता जैन यांचा नकली आवाज काढून जैन यांचे नाव आणि फोटो टाकून याचा एक व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. तसेच अपक्ष आमदार गीता जैन यांनी देखील तो माझा आवाज नसल्याचे स्पष्ट करत हा प्रकार निंदनीय असून आरोपीवर कारवाईची मागणी केली.