ठाणे : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) गुप्तचर पथकाने भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गावातून 'आयसिस' दहशतवादी संघटनेशी संबंधीत आणखी एका आरोपीला अटक केली. पथकाने शुक्रवार ११ ऑगस्ट रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिसरात छापेमारी केली. शमील साकिब नाचण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली मधून आतापर्यंत चार जणांना दहशतवादी कारवाईच्या संबंधात अटक करण्यात आली आहे. १० दिवसांपूर्वीच शमीलचा नातेवाईक अकिब नाचण याला याच परिसरातून अटक करण्यात आली होती. तर गेल्या महिन्यात शरजील शेख, (३५) आणि झुल्फिकार अली बडोदावाला (३६) या दोघांना अटक करण्यात आली होती.
एनआयएच्या पथकाने अचानक धाड टाकली : सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकाने शुक्रवारी पहाटे अचानक धाड टाकली. या धाडी दरम्यान शमीलला ताब्यात घेण्यात आले. शमील हा स्फोटके बनवून त्याची चाचणी करत असल्याचे समोर आले आहे. तो यापूर्वी अटक करण्यात आलेल्या इतर चार संशयितांच्या सहकार्याने काम करत होता. एनआयएच्या तपासात, अटक करण्यात आलेल्या यापूर्वीच्या चार जणांनी त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले आहे. या चौघांनी तरुणांना आरडीएक्स आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. तसेच आरोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती. यात आयईडी आणि लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे ही माहिती होती. यासह आरोपींनी संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी 'व्हॉईस ऑफ हिंद' या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती, असेही एनआयएने म्हटले आहे.
२८ जूनला धाड टाकली होती : २८ जून रोजी एनआयए पथकाने नोंदवलेल्या आयसीआयएस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणी संशयीतांच्या घरांची झडती घेण्यात आली. त्यावेळीही एनआयएच्या पथकाने आरोपींच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि आयसिसशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त केले होते. याद्वारे आरोपींचे आयसिसशी सक्रिय संबंध असल्याचे समोर आले होते.
ठाणे जिल्ह्यातून यापूर्वीही अटक झाली आहे : गेल्या वर्षी भिवंडी शहरातून दहशतवादी कृत्यांत सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय गेल्या दोन वर्षात मुंब्रा भागातूनही संशयिताना ताब्यात घेऊन अटक केली गेली आहे. २०१४ मध्ये कल्याणमधून चार तरुण आयसिसमध्ये भरती झाले होते.
हेही वाचा :