ठाणे - कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रस्ते व पदपथावर अतिक्रमण करून फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटला आहे. आता या फेरीवाल्यांनी चक्क पोलीस चौकीवरच कब्जा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी तसेच परिसरात असणाऱया रिक्षाचालकांसाठी, आणि स्टेशन परिसरात विळखा घालणारा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पोलीस चौकी उभारून देण्यात आली होती. मात्र, दहा वर्ष या चौकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. या चौकीतील संगणक आणि टीव्ही संच गायब झाल्याचे दिसून आले आहे. दिवसभर ही चौकी बंद असते आणि याच संधीचा पुरेपूर फायदा फेरीवाल्यांनी घेतला आहे. फेरीवाले विक्रीसाठी आणला जाणारा जास्तीचा माल या चौकीत कुलूपबंद करून ठेवत असल्याचे उघड झाले आहे.
फेरीवाल्यांचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फोटोग्राफरला शिवीगाळी आणि दमदाटी करण्यात आली. शहर व वाहतूक पोलीस या चौकीकडे फिरकण्याचे कष्ट घेत नसल्याने फेरीवाल्यांनी या चौकीवर कब्जा केला आहे. दरम्यान, फेरीवाल्यांनी कब्जा केलेल्या चौकीचा वापर पोलिसांनी सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.