नवी मुंबई - तळोजा कारागृहात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. त्यामुळे अनेक कैदी कोरोनाबाधित झाले असून, जेल प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी तळोजा कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांच्या विभागीय चौकशीची मागणी आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केली आहे. अनेक कैद्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असूनही तुरुंग प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक शेरिंग दोरजे आणि पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद (जेल) यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तळोजा कारागृहात कैद्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक कैद्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असूनही तुरुंग प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मुळात तळोजा तुरुंगात कैद्यांची कोरोना चाचणीच केली जात नाही. तळोजा तुरुंगात फक्त तीन बीएएमएस डॉक्टर आहे. एमबीबीएस डॉक्टर नसल्याने कैद्यांना उपचार सुद्धा बरोबर होत नाही आहेत असे या तक्रारीत म्हटले आहे
हेही वाचा - 'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले
गतवर्षी तळोजा कारागृहात चार कैद्यांची आत्महत्या:
गतवर्षी तळोजा तुरुंगात चार कैद्यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर या मृत कैद्यांच्या नातेवाईकांनी अनेकदा चौकशीची मागणी करुनही त्यांची तक्रार कोणीही ऐकून घेतलेली नाही. ३० एप्रिलला विशाल दसरी नावाच्या कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला वेळ निघून गेल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तळोजा कारागृहाची प्रशासनाने पाहणी करण्याची मागणी:
तळोजा कारागृह घडत असलेल्या सर्व गोष्टींची प्रशासनाने दखल घेत तळोजा तुरुंगाची पाहणी करावी, अशी मागणी शकील अहमद यांनी केली आहे. तळोजा तुरुंगाच्या एकूण २३१ कर्मचाऱ्यांना पैकी ११० कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्यात आले आहे त्यात एकूण ५१ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहे. तसेच तुरुंगात ४५ वयाच्या वर एकूण ३२१ कैदी आहेत त्यात फक्त ४४ कैद्यांचे लसीकरण झाले आहे. तसेच तळोजा जेलच्या कैद्यांची क्षमता २१२४ आहे मात्र आजही एकूण ३२५१ कैदी ठेवण्यात आले आहेत.
पाणी टंचाई व इतर सुविधांच्या अभावामुळे कैदी त्रस्त:
पाणी टंचाई व इतर सुविधांच्या अभावामुळे कैदी त्रस्त होत आहे. हे मानव अधिकाराचे उल्लंघन असल्याचे शकील अहमद शेख यांनी म्हटले आहे. संविधानाने सर्वांना सन्मानपूर्वक जगण्याचे अधिकार दिले आहेत.
तुरुंगातही कोरोना संसर्गाची भीती वाढली, मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
तुरुंगातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांतील उच्च स्तरीय समितीने गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
गेल्या वर्षी कोर्टाने सर्व कैद्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनेक कैद्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर सोडण्यात आलेले सर्व कैदी परत तुरुंगात आले आहेत. अनेक तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरलेले आहेत. त्यामुळे कैदी आणि कर्मचारीही संक्रमित होत आहेत. त्याची दखल चीफ जस्टीस एन. व्ही. रमना यांनी घेत हे आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा - नाशकात म्यूकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव वाढला, तीन रुग्णांचा मृत्यू, तर 150 जणांना बाधा