ठाणे - राज्यात सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाला होता. कल्याण डोंबिवली महापालिकेतही अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला होता. अखेर अधिकृतरित्या भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. मात्र, याचा फटका मनसेला बसला असून मनसेच्या विरोधीपक्ष नेतेपद भाजपच्या ताब्यात गेले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेमध्येही शिवसेना-भाजपमध्ये वादावादी झालेली सोमवारच्या महासभेत पहायला मिळाली. भाजप नगरसेविका आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी अनधिकृत बांधकाम आणि प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सभा तहकुबी दाखल केली होती. त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर पालिकेतील सेना-भाजपची युती तुटल्याचे जाहीर केल्याने मनसेकडे असलेले विरोधीपक्ष नेतेपद भाजपकडे गेले. मात्र, युती तुटल्याने मनसेलासुद्धा याचा फटका बसला असून विरोधी पक्ष नेतेपद गमवावे लागले. दुसरीकडे महासभेत मनसेने भाजपला विरोधीपक्ष नेतेपदावरून आक्षेप घेतला होता. मात्र, मनसेचा आक्षेप फेटाळून पिठासीन अधिकारी महापौर विनीता राणे यांनी भाजपचे राहुल दामले यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा केली, तर भाजप नगरसेवक शैलेश धात्रक यांची भाजप गटनेतेपदाची घोषणा केली. तसेच राष्ट्रवादीच्या गटनेते पदी संतोष तरे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
कडोंमपाची महासभा वादळी
कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा आज आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेची सुरुवातही अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. भाजपच्या उपेक्षा भोईर यांनी प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांच्यावर प्रशासनाने कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. पण, त्यावरूनच भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांविरोधातील जंगी कलगीतुरा सुरू झाला. एकीकडे भाजप सदस्य आणि दुसरीकडे शिवसेना सदस्य अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सभागृहात झडत होत्या. तर या दरम्यान महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दोन वेळा निवेदनही केले. ज्यावर उपेक्षा भोईर यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तर त्यानंतर पीठासीन अधिकारी महापौर विनिता राणे यांनी याप्रकरणी दिलेल्या निर्देशांवर भाजपने आक्षेप घेत महासभेतून सभागत्याग केला. यावेळी भाजपने शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कडोंमपातील विद्यमान पक्षीय संख्याबळ
शिवसेना - 53
भाजप - 43
काँग्रेस - 04
राष्ट्रवादी - 02
मनसे - 09
एमआयएम - 01
बसपा - 01
अपक्ष - 09
एकूण - 122
---------
शिवसेना + अपक्ष = 57 नगरसेवक (सर्वधिक नगरसेवक आहेत)
हेही वाचा - खंडणी प्रकरण: भाजप नगरसेवकाची ४ दिवस पोलीस कोठडीत रवानगी