ठाणे - ठाणे, मुंबई शहरात रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांच्या गळ्यामधील सोनसाखळ्या चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपीकडून दहा वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरलेले ६ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने आणि १५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. अकबर अली उर्फ दबंग खान (रा. मुंब्रा) असे आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
हेही वाचा - नामोउल्लेख टाळत आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका, म्हणाले...
अकबर अली हा नितीन कंपनी परिसरामध्ये रेकी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने वागळे इस्टेट, कोपरी, श्रीनगर, चितळसर, विठ्ठलवाडी या भागात दहा वेगवेगळे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून जवळपास ६ लाख रुपयाचे 106 ग्राम सोने हस्तगत केले आहे. त्यासोबत १५ मोबाईल फोन देखील पोलिसांनी मिळवले आहेत.
अकबरने मुंबईमधील मलबार हील, विलेपार्ले, घाटकोपर या भागात गुन्हे केल्याचे सांगितले. याप्रकरणी गुन्हे शाखेने मोहम्मद इमरान अरब या वीस वर्षीय वाहन चोराला देखील अटक केली आहे. त्याने कळवा सायन येथून वाहन चोरी केल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे. त्याच्याकडून तीन वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
आरोपीचा पूर्व इतिहास
अकबर अली खान याच्यावर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात २, श्रीनगर पोलीस ठाण्यात १, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात १, चितळसर पोलीस ठाण्यात १ असे पाच गुन्हे दाखल आहेत. तर, पायधुनी, मलबार हिल, विलेपार्ले येथे केलेल्या गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड होता. हा आरोपी इराणी टोळीचा सदस्य असून, इराणी टोळी ही चेन स्नॅचिंगसाठी प्रसिद्ध आहे. या टोळीने पोलिसांवर हल्ला देखील केल्याचे पोलीस रेकॉर्डवर आहे. पोलीस आता याप्रकरणी अधिक चौकशी करत असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - पत्रीपुलाच्या लोकार्पणवेळी पुलाच्या नामकरणावरून मुख्यमंत्र्याची भाजपवर टोमणेबाजी