ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मंगळवारी दिवसभरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. तर, एका रुग्णाला बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ न झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५६ वर गेला आहे. खळबळजनक बाब म्हणजे, ५६ पैकी डोंबिवलीतीलच ३४ रुग्ण आहेत. मात्र, त्यापैकी डोंबिवली पूर्वेकडील एका रुग्णाला मंगळवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला असून डोंबिवलीतील आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका क्षेत्रात सुरुवातीच्या काळात विदेशातून आलेल्या काही नागरिक संशयित कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने सतर्क होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या होत्या. याच काळात तुर्कीहून कल्याण पूर्वेत आलेल्या एका तरुणाला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, या तरुणाने होम क्वारंटाईनचा आदेश असताना तो मोडून डोंबिवलीतील एका लग्न सोहळ्याला त्याने हजेरी लावली होती. तेव्हापासून डोंबिवलीतील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन केवळ डोंबिवलीतच ३४ रुग्ण आढळून आले आहेत.
महापालिका क्षेत्रात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची ४१ असून आतापर्यत १२ जण बरे झाल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विगतवारी पाहाता डोंबिवली पूर्वेकडील २८ रुग्ण तर, डोंबिवली पश्चिमेला ८ रुग्ण, कल्याण पूर्वेत १३ तर कल्याण पश्चिमेला ७ रुग्ण तसेच टिटवाळा आणि मोहने गावात प्रत्येकी एक रुग्ण असे ५६ रुग्ण आतापर्यत आढळून आले आहेत.
पालिका क्षेत्रात कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात ८ ठिकाणी तापाचे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. शिवाय, डोंबिवलीत आर. आर. हॉस्पिटल देखील कोव्हिड हेल्थ सेंटर म्हणून महापालिकेने ताब्यात घेतले आहे. या ठिकाणीही तापाचा दवाखाना २४ तास चालू राहणार असून सर्दी, ताप, खोकला, घसादुखी अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. या रुग्णालयाचा सर्व खर्च महापालिका करणार आहे.
फक्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी कल्याण शिळरोड येथील निऑन हॉस्पिटलचे सहकार्य महापालिकेने घेतलेले असून तेथील रूग्णालयाचा व कर्मचारी वर्गाचा सर्व खर्च महापालिका करणार आहे. तसेच रुग्णांच्या सेवेसाठी होली क्रॉस हॉस्पिटल, कल्याण (प) यांचे बरोबरही सामंजस्य करार करण्यात येत आहे. तर 'अ' प्रभाग क्षेत्रातील मोहना अर्बन हेल्थ पोस्ट, वडवली, ठिकाणीही तापाचा दवाखाना सुरु केला आहे. नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, घसादुखी अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी वरील नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.