ठाणे - वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांच्या प्रचारार्थ शिवाजी मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला फक्त २०० ते ३०० नागरिकांनी हजेरी लावली. यामुळे सभेला गर्दी होत नसल्याचे कळताच प्रकाश आंबेडकर ठाण्यात येऊनही सभेच्या ठिकाणी न येता परस्पर मुंबईला निघून गेल्याची चर्चा रंगली आहे.
त्यानंतर प्रकाश आंबोडकरांची तब्येत ठीक नसल्याचे कारण कार्यकर्त्यांकडून दिले जात आहे. मात्र, गर्दी झाली नसल्यामुळेच प्रकाश आंबेडकर सभेला उपस्थित राहिले नसल्याची माहिती आहे. जे नागरिक सभेसाठी आले होते. तेही उठून जाऊ नये, यासाठी प्रकाश आंबेडकर येणार नसल्याची माहिती शेवटपर्यंत नागरिकांना देण्यात आली नाही.
अखेर भायखळ्याचे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सभेला संबोधित केले. ठाणे लोकसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीच्या वतीने मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना युतीचे उमेदवारी राजन विचारे आणि आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्याबरोबर आहे.