ठाणे New Variant of Covid 19 : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएन वन या नवीन व्हेरिएंटचा रुग्ण दाखल झालाय. 19 वर्षीय तरुणीला मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
ठाणे मनपा सतर्क : नवीन व्हेरिएंटचा पहिलाच रुग्ण ठाण्यात आढळला असून यामुळं ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालीय. जेएन वन हा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट केरळमध्ये आढळलाय. तीनशेहून अधिक जणांची आठवडाभरात केलेल्या तपासणीनंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत या व्हेरियंटचे 13 रुग्ण असून राज्यात हा आकडा 24 वर गेला आहे. ठाण्यातही या वेरियंट्सचा रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागलीय. ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळला असून पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येण्याची शक्यता आहे. या वृत्ताला कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र भारूड यांनीही दुजोरा दिलाय.
ठाण्यातील एका 19 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झालीय. या तरुणीवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे इथं पाठविण्यात येणार आहेत. अहवालानंतरच कोणता व्हेरियंट आहे, याची माहिती समोर येईल. - डॉ. अनिरुद्ध माळगावकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी
केरळमध्ये आढळला होता पहिला रुग्ण : केरळमध्ये 8 डिसेंबर रोजी कोविड-19 च्या जेएन वन व्हेरिएंटच्या एका रुग्णाची नोंद झाली होती. 18 नोव्हेंबर रोजी 79 वर्षीय महिलेच्या नमुन्याची आरटी-पीसीआरद्वारे चाचणी केली होती. या चाचणीतून तिला कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची लागण झाल्याचं निदान झालं. या महिलेला इन्फ्लूएंझासारख्या आजाराची सौम्य लक्षणं होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून : केरळमध्ये उदयास आलेल्या जेएन वन व्हेरिएंटच्या बाबतीत, भारत सरकारनं असं म्हटलंय की, लोकांचं मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून राज्यांमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये मॉक चाचण्या घेतल्या जातील. आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेचे उपाय म्हणून ड्रिल घेण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा :