ठाणे - ॲाक्सिजनच्या कमतरतेमुळे या कोव्हिड काळात अनेक कोव्हिड रुग्णांचे हाल झाले. तर काही ठिकाणी रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. ही परिस्थिती भयानक आहे. मात्र, आता ठाण्यातील सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये रुग्णांचे ऑक्सिजन वाचून हाल होणार नाहीत. या रुग्णालयात ॲाक्सिजनची कायम स्वपरूपी सोय करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये आक्सिजनची कमतरता पडू लागली होती. त्यामुळे काही अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय होऊ लागली. कित्येक रुग्णांचे ऑक्सिजनवाचून जीव गेल्याच्या काही घटनाही समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने आता शासकीय रुग्णालयात १०० - २०० लीटर नाही तर तब्बल १० हजार आणि ६ हजार लिटरच्या लिक्विड ॲाक्सिजन असलेल्या टाक्यांची यंत्रणा उभी केली आहे. ज्यामुळे सिव्हील हाॅस्पिटल मधील एकाही रुग्णाला आता ॲाक्सिजनची कमतरता भासणार नाही.
एकाच वेळेस तब्बल ५०० रुग्णांना ॲाक्सिजन पुरवला जाऊ शकतो अशी ही अद्यावत यंत्रणा आहे. या दोन्ही टाक्यांमधील ॲाक्सिजन पातळी कमी झाल्यास ॲाटोमॅटिक ॲाक्सिजन रिफिल करणा-यांना तशी सुचना जाईल आणि ॲाक्सिजन रिफिल करणारे येवून रिफिल करुन जातील, अशीही अद्यावत यंत्रणा आहे. ठाणे सिव्हील हाॅस्पिटलचे सिव्हील सर्जन आणि जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी बाबत अधिक माहिती दिली आहे.