ठाणे - येथील ठाणे पालिकेच्या दहा प्रभाग समितीत बुधवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांचा गुणाकार होत चक्क १९७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, बुधवारी १० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांच्या संख्येत वाढ होऊन आतापर्यंत मृत्यूंची संख्या २३३ वर पोहोचली आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या दहा प्रभाग समितीत कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत २१ नवे रुग्ण बुधवारी आढळले. तर, वर्तकनगर प्रभाग समितीत-२३ नवे रुग्ण, लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीत २० रुग्ण, नौपाडा-०, कोपरी प्रभाग समितीत ३२ नवे रुग्णांचा भरणा झालेला आहे. तर, उथळसर प्रभाग समितीत २४ नवे रुग्ण, वागळे प्रभाग समितीत २१ नवे रुग्ण, कळवा प्रभाग समितीत ३५ नवे रुग्ण, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीत प्रत्येकी १० नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांचा आकडा १९७ गेल्याने ठाण्यात कोरोनाचा हाहाकार दिसत आहे.
ठाण्यात एकूण कोरोना रुग्णांपैकी ५२ टक्के रुग्ण म्हणजेच ३ हजार ५०३ बरे होऊन घरी परतले आहेत. तर, प्रत्यक्षात ठाण्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ९१ इतकी आहे. यात बुधवारी दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २३३ वर पोहोचला आहे.
ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू -
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागात कोरोनाने शिरकाव केला असून या विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे मृत्यू झाला. सुजीत नार्वेकर (वय 47) रा. पारशीवाडी, ठाणे पूर्व असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, ठाणे या संघटनेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात सेवा बजावणारे सुजीत यांना ताप आल्याने 10 जूनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. रुग्णालयात दाखल केल्यापासून संघटनेचे राजु कांबळे, सुजीत लोंढे आदींनी नार्वेकर कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली. मात्र,कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे ह्लदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कक्षात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कर्मचारी वर्ग धास्तावला आहे.