ठाणे - नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर एका गरोदर महिलेने बाळाला रुग्णालयात जन्म दिला. मात्र, ते बाळ कुपोषित होते. त्यामुळे दुर्दैवाने त्या बाळाचा मृत्यू झाला. गरोदरपणामध्ये महिलेला योग्य आहार न मिळाल्याने, हे बाळ कुपोषीत राहिले, असा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. ही घटना भिवंडीतील कामतघर परिसरात घडली. या घटनेने शासकीय आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे.
बाळंतीण अर्चना प्रमोद बोल्ली (वय २५ रा. ताडाळी रोड , कामतघर ) असे बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे नाव असून तिने शुक्रवारी कळव्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला होता. मात्र, दुर्दैवाने ते बाळ कुपोषित जन्माला आल्याने त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
राज्य सरकार कुपोषण टाळण्यासाठी गरोदर मातांना विविध योजनांद्वारे आहार पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, या दुर्दैवी मातेला गरोदरपणात योग्य आहार मिळू न शकल्याने तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची शासनाच्या आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. या घटनेस जबाबदार असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघनांनी केली आहे.