ठाणे - महाराष्ट्र शासनाच्या कचऱ्यापासून वीज बनवण्याच्या प्रकल्पाची रूपरेखा ठरवण्यासाठी नेदरलँडच्या एका कंपनीने शनिवारी पाहणी दौरा केला. यावेळी नेदरलँड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ओला कचरा व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाने नेदरलँडच्या अॅमस्टरडॅम सिटी या कंपनीबरोबर उल्हासनगर महापालिकेत कचऱ्यापासून वीज बनवण्याचा करार केला आहे. या करारात घरातील कचऱ्यापासून वीज बनवण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे. यासाठी नेदरलँडचे एक पथक हा प्रकल्प पाहण्यासाठी आले होते. त्यामध्ये प्रकल्प सल्लागार पीटर सिमोंस, स्टेप फेव्हरे, टीम रुईजस, लोक्स लेलीजव्हेल्ड, एलॉसटेअर बेएम्स यांनी डम्पिंगचा पाहणी दौरा केला. यावेळी कचऱ्यात कोणत्या घटकांचा समावेश आहे याची पाहणी केली. त्याबरोबरच डम्पिंग ग्राउंडची पार्श्वभूमी, शहरातील क्षेत्रफळ, लोकसंख्या, ओला व सुका कचऱ्याच्या प्रमाणाबाबत माहिती गोळा केली.
या पाहणी दौऱ्यात उल्हासनगर पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी महापौर पंचम कलानी, उपमहापौर जीवन ईदनांनी, सभागृह नेते जमनादास पुरस्सवानी, उपायुक्त विकास चव्हाण, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केने, एकनाथ पवार, अभियंता चंद्रगुप्त सोनावणे, नगरसेविका मीना सोंडे, नगरसेवक राजेश वधारिया यांच्यासह पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.