नवी मुंबई - दिवसेंदिवस नवी मुंबईतील कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. ते आवाक्यात आणण्यासाठी अधिकाधिक चाचण्यांवर भर देणार असल्याचे वक्तव्य नवी मुंबईचे नवे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. अभिजीत बांगर यांनी आज पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते. कोरोना संक्रमण काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून 100 टक्के कामाची गरज आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही ते म्हणाले.
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत शहरात जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत बांगर यांनी व्यक्त केले. त्याकरिता महापालिकेच्या स्वतःच्या मालकीची प्रयोगशाळा उभारणीच्या कामाला गती देणार असल्याचे बांगर यांनी म्हटले आहे. महामारीच्या काळातही जर कोणी कामचुकारपणा करत असेल तर अशा कर्मचारी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही बांगर म्हणाले.
कोरोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी संसर्गाची साखळी खंडीत होणे गरजेचे आहे. त्याकरिता लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचेही बांगर यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या उपचारांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी तज्ज्ञ जाणकारांची मदत घेतली जाणार असल्याचे बांगर म्हणाले. तसेच कोरोना संशयित रुग्णांना तत्काळ दिलासा मिळावा, याकरिता सर्व रुग्णालयांना अँन्टिजेन टेस्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेने स्वतः च्या रुग्णालयांसाठी सुमारे 40 हजार अँन्टिजेन टेस्टच्या किट्स घेतल्या आहेत. त्यामुळे लवकरच शहरात अँन्टिजेन टेस्ट सुरू होणार असल्याची माहितीही अभिजित बांगर यांनी दिली आहे.