ठाणे - पुलवामा येथील दहशशतवादी हल्ल्याचे पडसाद मुस्लीम बहुल भाग असलेल्या मुंब्रामध्येही उमटले आहेत. येथील मुस्लीम बांधवांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाक लष्करप्रमुख कमर जावेद बावजा यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, कळवा- मुंब्रा युवक अध्यक्ष, नगरसेवक शानू पठाण तसेच विधानसभाध्यक्ष शमीम खान यांच्यासह मुस्लीम बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.
काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांनवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद मुंब्रा या मुस्लीमबहुल भागातही उमटलेले पाहायला मिळाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंब्रा येथील मुस्लीम बांधवांनी निषेध व्यक्त केला. दारुल फलाह मशीदीसमोर जमा झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जुम्माचा नमाज अदा केल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे इम्रान खान आणि बावजा यांचे पुतळे जाळून आपल्या मनातील संताप व्यक्त केला. तर, उपस्थित मुल्ला-मौलवींनी वीरमरण आलेल्या जवानांसाठी दुवा पठण केले
याप्रसंगी बोलताना आनंद परांजपे म्हणाले, या हल्ल्याच्या बाबतीत राजकारण करण्याची ही वेळ नाही. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. नुसत्या घोषणा देऊन किंवा दंड थोपटून काहीही होणार नाही. आता या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असे सांगितले. शानू पठाण यांनी सांगितले की, या देशाच्या सुरक्षेवरच नाही तर आमच्या अस्मीतेवर हा घाला घालण्यात आला असून येथील लहान मुलेदेखील पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सज्ज आहेत. तर, शमीम खान यांनी, पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे.