ठाणे - सत्तेत राहण्यासाठी सरकारी यंत्रणांचा तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून 'ब्लॅकमेलिंग'चा व्यवसाय करणे, ही सरकारची भूमिका योग्य नसल्याचा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे सत्ता स्थापनेवरून संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खबळजनक आरोप केला आहे.
हेही वाचा - ठाण्यात मनसे, राष्ट्रवादीची पालिका निवडणुकीसाठी आघाडी?
सत्ता स्थापनेवरून शिवसेना भाजप या दोघांनीही अजून आपली ताठर भूमिका सोडलेली नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांच्या पाठबळाची आवश्यकता आहे. असे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी सरकारी यंत्रणांवर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. पालघरमध्ये विरोधी पक्षाचे पाच आमदार आहेत. कोणाचे नाव घेत नाही, एक ज्येष्ठ अधिकारी असे सांगतो अमूक अमूक आमदारांचे काही शूटिंग भाषणे मला पाहिजे, असे वक्तव्य या अधिकाऱ्यांनी केले असून या सर्व गोष्टी या अधिकाऱ्यांना कशाला हव्या आहेत? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. याचाच अर्थ सरकारी यंत्रनेचा वापर करून ब्लॅकमेलिंगचा व्यवसाय सुरू होणार आहे. केवळ सत्तेत राहण्यासाठी सरकारची ही ब्लॅकमेलिंगची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - ठाण्यात 'लालपरी'मध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल
३५६ कलम, राज्य आणि केंद्र सरकार यांचे संबंध, या गोष्टींकडे कधीच सर्वसामान्य जनतेचे लक्ष जात नाही. ३५६ कलम हे इतिहासात खूप वेळा वापरलं आहे. याचा वापर करून विधानसभा घालवून राष्ट्रपती राजवट लागू करायची. दुसरा धोका घोडेबाजाराचा आहे. सरकार घोडेबाजी करेल आणि महाराष्ट्राची संस्कृती लयास जाईल, अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतलीये, ही भूमिका कायम राहणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.