ठाणे - सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत आहे. केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने लसीकरणासह अनेक बाबतीत सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खारीचा वाटा म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपले तीन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी दिली.
आर्थिक मदत गरजेची -
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. प्रतिकूल स्थिती असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत चोख काम करीत आहेत. सीरम किंवा भारत बायोटेककडून लसींच्या दरात केलेली कपातही नगण्य आहे. अशा स्थितीमध्ये मोफत लसीकरण करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते नजीब मुल्ला, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व म्हणजे 33 नगरसेवकांशी चर्चा करुन तीन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री निधीत वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 15 लाख रुपयांची गंगाजळी जमा होणार आहे, असेही पठाण यांनी सांगितले.
हेही वाचा - आजपासून महापालिकेच्या ५ केंद्रांवर १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण; नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य