ठाणे - ढासळलेली रुग्णव्यवस्था बळकट करण्याची गरज असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. कर्करोगाच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रातच नाही तर देशात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कर्करोग असणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयाची गरज असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
शहापूर तालुक्यातील दोऱ्याचापाडा येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय व शैक्षणिक संकुलचे भूमिपूजन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र अव्हाड, आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे, दौलत दरोडा, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
हा जाणता राजा नाही तर मग कोण, आव्हाडांचा टोला
शरद पवारांना मी जाणता राजा बोललो, त्यावेळी विरोधकांनी माझ्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. तेव्हा मी त्यांना संगितले, छत्रपती एकच होऊ शकतात, शिवाजी महाराज एकच होऊ शकतात. पण जाणता राजा कोण? जो आदिवासींची दुःख जाणतो, जिल्ह्यात एमआयडीसी देतो, आदिवासी समाजाचा नाच आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करणारा हा जाणता राजा नाही तर मग कोण असे बोलत मंत्री जितेंद्र आव्हाडांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली.
हेही वाचा - 'कोरेगाव-भीमा प्रकरणी एनआयए चौकशीचे केंद्राचे पत्र मिळाल्यानंतर पुढील पाऊल उचलणार'
हेही वाचा - "आव्हाडांसोबत चर्चा करुन त्यांचे गैरसमज दूर करू"
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतमजूरांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मोफत मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी शहापूरमध्ये केजी ते पीजी असे सर्वच व्यवसायिक अभ्यासक्रम एकाच छताखाली आसणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य विद्यासंकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. ती गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर आहे. यासाठीच ठाणे - पालघर तसेच कोकण व नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य विद्यासंकुलाची उभारणी होत आहे. गोरगरीबांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी 100 खाटांचे मोफत कर्करोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि 100 खाटांच्या जनरल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचीही उभारणी करण्यात येत आहे.