नवी मुंबई - उपनगरात कोरोनाचा कहर वाढत असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी नवी मुंबईत 65 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आत्तापर्यंत हा एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे.
अत्यावश्यक सेवेत आणि एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या काही व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पालिका प्रशसनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत 603 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पैकी 11 जण हे इतर ठिकाणचे रहिवासी आहेत.
आत्तापर्यंत नवी मुंबईत 6 हजार 266 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 4 हजार 113 जण निगेटीव्ह आले असून, 1 हजार 617 जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. शनिवारी 356 जणांचे अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 271 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 65 पॉझिटिव्ह आहेत. यात तुर्भे 21, कोपरखैरणे 8 , नेरुळ 15, वाशीतील 9, घणसोली 5, ऐरोली 5, दिघी, बेलापूर प्रत्येकी 1 असे एकूण 65 रुग्णांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत शहरात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला असून, 75 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नवी मुंबईत 91 ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आली आहेत.