ठाणे - लोकसभा निवडणुकीत पहिल्या ३ टप्प्यात भाजपची पीछेहाट होत असल्याचे सर्व्हेतून पुढे येत असल्यानेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. म्हणून भाजपने लांडगा आला रे आला, अशी व्यवस्था निर्माण केली आहे. भाजपचे नेते निवडणुकीसाठी भावनिक आवाहन करत आहेत. म्हणजे त्यांच्या भाषेत जुमलेबाजीचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी ते भिवंडी तालुक्यातील अंबाडी गावात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पटोले म्हणाले, जनता आता भाजपच्या जुमलेबाजीला फसणार नाही. संविधानाची विचारणा वाचवण्यासाठी जनता काँग्रेसला साथ देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नरेंद्र मोदी विविध वृत्त वाहिन्यांवर मुलाखती देऊन प्रमोशन करण्याचा प्रयत्न करत आहेत का? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले यांनी मोदींवर टीका केली. मोदींनी २०१४ ची निवडणूक भावनिक व जातीच्या नावाने प्रचार करून जिंकली. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्यांनी बहुजनांसह देशाच्या व्यवस्थेला संपविण्याचे कारस्थान रचले, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.