ठाणे - अंगात भूत संचारल्याच्या संशयातून मायलेकाची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याणनजीक असलेल्या अटाळी गावात घडली असून, अघोरी विद्येमुळे मायलेकाचा हकनाक बळी घेणाऱ्या मांत्रिकासह चारही आरोपी खडकपाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. खळबळजनक बाब म्हणजे मृताचा १७ वर्षीय अल्पवीयन मुलगा या कटात सामील असल्याचे समोर आले आहे.
दुहेरी हत्याकांडामुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मांत्रिक सुरेंद्र पाटील (वय-३५,) विनायक कैलास तरे (वय -२२), कुमारी कविता कैलास तरे (वय-२७) आणि मृताचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. आरोपीमध्ये बहीण भावाचा समावेश आहे. तर पंढरीनाथ शिवराम तरे (वय -५०) आणि त्याची आई चंदूबाई शिवराम तरे (वय- ७६) असे हत्या झालेल्या मायलेकाची नावे आहेत.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृत पंढरीनाथ कल्याणनजीक असलेल्या अटाळी गावातील गणेशनगर परिसरात पत्नी, आई आणि आरोपी मुलासोबत राहत होते. शेजारी राहणारी त्यांची पुतणी आरोपी कविताच्या अंगात काही दिवसापासून दैवीशक्ती असल्याने तिला आरोपी मांत्रिक सुरेंद्रकडे उपचारासाठी मृताची पत्नी रेश्मा घेऊन जात असे. मात्र, त्यावेळी आरोपी मांत्रिक सुरेंद्रने त्यांना सांगितले की, पंढरीनाथ व त्याची आई चंदूबाई यांच्या अंगात भूत शिरले असून, त्याला तंत्रमंत्र करून बाहेर काढावे लागेल. असे सांगताच शनिवारी दुपारच्या सुमाराला मृत पंढरीनाथच्या राहत्या घरात मांत्रिकासह या चारजणांनी त्या दोघा मायलेकांच्या अंगावर हळद लावून दिवसभर दांडक्याने बदडून दोघांना जीवे ठार मारून टाकले.
याप्रकरणी देवेंद्र तुळशीराम भोईर (वय- ३८) याच्या तक्रारीवरून मांत्रिकासह चारही आरोपी विरोधात कलम ३०२, ३४ सह अंधश्रध्दा निर्मूलन कायदा २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपीना बेड्या ठोकल्या तर मृताच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली आहे.