ठाणे : उल्हासनगर कॅम्प चार परिसरात रस्त्याने पायी जात असताना झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाला आहे. खळबळजनक बाब म्हणजे तरुणाला बेदम मारहाण करण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यासंदर्भात पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. बाळा उर्फ समीर गायकवाड, गौरव गोदिया, मनीष बिहारी दुसेजा अशी आरोपींची नावे आहेत. राकेश कुकरेजा (४९ वर्ष) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चालताना झाला होता वाद : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक कुकरेजा हा उल्हासनगर कॅम्प चार परिसरात राहत होता. नेताजी चौक येथील मनोर अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर त्याचे घर होते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो नोकरी करत होता. त्यातच १६ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मृतक कुकरेजा हा उल्हासनगर कॅम्प चार परिसरात असलेल्या शीतलामाता मंदिराच्या समोरून रस्त्याने पायी जात होता. त्याचवेळी आरोपी बाळा उर्फ समीर याला आणि त्याच्या दोन साथीदारांना कुकरेजचा धक्का लागला होता. याच वादातून तिन्ही आरोपींनी मिळून त्याला बेदम मारहाण करत बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती.
तिन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा : घटनेची माहिती कुकरेजच्या नातेवाईकांना मिळताच त्याला मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने कुकरेजाला मुंबईतील केईएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा १७ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानंतर तिन्ही आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कुकरेजा यांचा मुलगा तरुण (वय २२) यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०४, ३४ प्रमाणे तिन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.यु. बडे करीत आहेत. त्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच लवकरात लवकर फरार आरोपींचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
हेही वाचा - Delhi Crime News : राजधानी दिल्लीत 'सैराट'सारखा थरार, बापाने मुलीच्या प्रियकराची केली दिवसाढवळ्या हत्या!