नवी मुंबई - वाशी येथील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये रविवारी एका ४० वर्षीय व्यक्तीची त्याच्याच मित्राने लाकडी दंडुक्याने वार करत निर्घुण हत्या केली आहे. शंकर पानसरे असे या मृत व्यक्तीचे नाव असून 29 तारखेला रात्री 8 च्या सुमारास हा खून झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच ठिकाणी आरोपी रवी आणि मृत शंकर हे दोघे काम करत होते. दोघांमध्ये काही अंतर्गत प्रकरणामुळे वाद होता. याचाच राग मनात ठेवून काल रात्री लाकडी दंडूक्याने रवी याने शंकर याच्या डोक्यावर जोरदार प्रहार करत त्याचा काटा काढला. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे शंकर याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात फरार आरोपी रवी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत रवीचा शोध घेत आहेत.