ठाणे - अंबरनाथमध्ये एका २० वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आली. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना अंबरनाथ पूर्व भागातील जय भवानी अपार्टमेंटमध्ये घडली. सोनाली गिरी असे हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मृतदेहावर मारहाणीच्या खुणा
मृत सोनाली ही कुटुंबासह अंबरनाथ पूर्व भागातील जय भवानी अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर आपल्या सासरच्या मंडळींसह राहत होती. मात्र, आज सकाळच्या सुमारास अचानक तिचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून सोनालीचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे घरगुती वादातून घरातील कोणीतरी ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चौकशीसाठी घरातील काहींना ताब्यात देखील घेतले आहे. याप्रकरणाची गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.