ठाणे - एसटी महामंडळ मुरबाड येथील आगार प्रमुखाच्या मनमानी व अंदाधुंद कारभाराचा स्वराज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. राज्य परिवहन विभागाच्या जिल्हा आगार प्रमुखाकडे त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी निवेदनही दिले. यावेळी मुरबाड एसटी आगार प्रमुखाच्या निलंबनाच्या मागणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याला घेराव घातल्याने एकच गोंधळ उडाला होता.
विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबरला एसटीचा अपघात होऊन या अपघातात सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी २ प्रवाशी हे गंभीर जखमी झाले. मात्र, जखमींना आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत एसटी महामंडळाकडून मिळालेली नाही. तर, केवळ आश्वासन देऊन कागद रंगवण्याचे काम मुरबाड परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याने केल्याचा आरोप मुरबाडचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांनी केला आहे.
हेही वाचा - 'फेसबुक'वरील मैत्री पडली महागात; मैत्रिणीने घातला मित्राला गंडा
राज्य परिवहन विभागामार्फत मुरबाड एसटी स्थानकात प्रवाशांसाठी विविध सुविधा पुरविण्यात येतात. मात्र, मुरबाड आगारचे प्रमुख सतीश मालाचे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मनमानी, अंदाधुंद आणि भ्रष्टचारी चालवला आहे. त्यांच्या या कारभारामुळे प्रवाशांसाठी मिळणाऱ्या सुविधा जाणीवपूर्वक नाकारण्यात येत असल्याचा आरोप स्वराज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केला. हा आगार प्रमुख प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. शिवाय बस वाहक-चालकांच्या कामावर त्याचे कुठलेही नियंत्रण नसल्याने काही चालक व्यसन करून कर्तव्य बजावत असल्याचा खळबळजनक आरोपही केला. गेल्या काही महिन्यांपासून मुरबाड स्थानकातील विविध मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला अनेक लहान मोठ्या वाहनांचा झालेल्या अपघातावरून ते स्पष्ट होत आहे.
हेही वाचा - झाडाझुडुपात आढळली एक महिन्याची जिवंत 'नकोशी', परिसरात खळबळ
स्वराज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोहन सासे, बाळा चौधरी, शंकर गायकर, संतोष पवार, सुनील बांगर, मिलिंद मडके, नितीन सूर्यवंशी, मनोज देसले यांच्यासह २० ते २५ कार्यकत्यांनी गुरूवारी परिवहन महामंडळाचे कार्यालय गाठले. त्यानंतर येथील अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांना मुरबाड आगार प्रमुख मालाचे यांचे तातडीने निलंबन करण्याच्या मागणी करत घेराव घातला. तसेच जोपर्यत मुरबाड आगार प्रमुखावर निलंबनाची कारवाई होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही स्वराज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकारी सासे यांनी दिला आहे.
हेही वाचा - भिवंडीत उड्डाण पुलावरील मार्गदर्शक फलकाचा खांब कोसळला