ठाणे - गरीब व गरजू मुले शिक्षण घेण्यासाठी महापालिकेच्या शाळेचा आसरा घेऊन हलाखीच्या परिस्थितीत शिकत असतात. मात्र, या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्याकडून शाळेतील शौचालय साफसफाई करून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार डोंबिवलीत महापालिकेच्या एका शाळेत घडला असून शाळकरी विद्यार्थ्यांकडून शौचालय साफसफाई करुन घेतली जात असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक परिसरात महापालिकेच्या हिंदी आणि मराठी माध्यमाच्या दोन शाळा आहे. या दोन्ही शाळा एका इमारतीत भरतात. या शाळेत समाजसेविका सुजाता चव्हाण या काही कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी काही शाळकरी विद्यार्थिनी शौचालयाची स्वच्छता करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी विद्यार्थ्यांचे कपडे ओले झाले होते. यावेळी चव्हाण यांनी हा सर्व प्रकार फोनमध्ये व्हिडिओद्वारे कैद केला. त्यांनतर शाळेत जाऊन याप्रकरणी चौकशी केली, तेव्हा शाळा व्यवस्थापनाने बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा - पैशाच्या आमिषाने दहावीच्या परीक्षेत बसलेल्या तोतया विद्यार्थ्याला अटक
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेने सांगितले, ८ वर्षांपासून स्वच्छता कामगार व मदतनीस नसल्याने विद्यार्थी व शिक्षक स्वत: स्वच्छता करतात. मात्र, हा प्रकार संतापजनक असल्याने यासंदर्भात समाजसेविका सुजाता चव्हाण यांच्यासह नंदा वास्के, सरिता मोरे यांनी केडीएमसी उपायुक्त मिलिंद धाट यांच्याकडे तक्रार केली आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून विद्यार्थीनींकडून साफसफाई करून घेणे निंदनीय असल्याचे केडीएमसीच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त मिलींद धाट म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी संकेत दिले. दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या शाळेत शिक्षणाच्या बिकट अवस्थेसह आरोग्य विभागातही दुरवस्था दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'शिवसेने'ला पुन्हा झटका