ठाणे - भिवंडी शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागातील प्रशासकीय अनियमीतता व आर्थिक अपहार प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत, गोपनीय चौकशीअंती दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने आठ महिन्यांपूर्वी पालिकेच्या मुख्य लेखा परिक्षकांमार्फत प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांच्यासह फार्मासिस्ट, कार्यालयीन अधिक्षक, लिपीक व पंधरा आरोग्य केंद्राचे डॉक्टर व कर्मचारी यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, या चौकशीत टॉप टेन नगरसेवकांचा हस्तक्षेप वाढल्याने दबावाच्या भीतीपोटी चौकशी अहवाल बंद लिफाफ्यात पडून आहे. या अहवालामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने आरोग्य व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या कार्यक्षेतत्रात सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागाअंतर्गत शहरात विविध ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू असून या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसाठी शासनाने दरवर्षी औषधांचा पुरवठा केला आहे. त्यापैकी २०१५-१६ पासून सन २०१८-१९ पर्यंत या विभागातील प्रशासकीय अनियमीतता, आर्थिक अपहार तसेच शासनाकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्वाचे दस्ताऐवज गहाळ करून आर्थिक अपहार केल्याची तक्रार भाजप व शिवसेना नगरसेवकांनी महापौर दळवी यांच्याकडे केली होती. त्यामुळे महापौर जावेद दळवी यांनी दखल घेत शासनाकडे तक्रार केली आहे. तसेच त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांच्यासह चार कर्मचारी तसेच १ ते १५ नागरी आरोग्यकेंद्र व वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या बाबत शासनाने महापालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांना या प्रकरणी गोपनीय चौकशी करून अहवाल मागितल्याने कार्यालयीन चौकशी करीत आयुक्त हिरे यांनी महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक कालिदास जाधव यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, लेखापरिक्षक जाधव यांनी मागील महिन्यात सुनावणी घेतली असता शासनाकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्वाचे दस्ताऐवज डॉ. विद्या शेट्टी यांनी सादर केलेले नाही. तर काही औषधे व दस्तऐवज आगीमध्ये जळून खाक झाल्याचा बहाणा करण्यात आला आहे. मात्र, याबाबत डॉ. शेट्टी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही. त्यामुळे ही आग संशयाच्या धुरात सापडली आहे.
राज्य शासनाकडील शासकीय रूग्णालय, डी. डी. कार्यालय, डी. एच. ए. कार्यालय, क्षयरोग कार्यालय पुणे आदींकडून आलेल्या लाखो रूपयांच्या औषधसाठा तसेच जन्म, मृत्यू दाखल्यांबाबत प्रशासकीय अनियमीतता, आर्थिक अपहार प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांच्यासह अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुनावणी बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर आयुक्त मनोहर हिरे यांनी चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे संकेत दिले आहेत.
दरम्यान, भिवंडी महापालिकेच्या प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांच्यावर महापौर जावेद दळवी यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी शासन निर्देशानूसार आयुक्त मनोहर हिरे यांनी माझी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानूसार वैद्यकीय विभागाची चौकशी सुरु आहे. डॉ. विद्या शेट्टी यांची देखील चौकशी केली आहे. काही मुद्यांबाबत अद्यापी चौकशी होणे बाकी आहे. येत्या काही दिवसात चौकशी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर महापौर जावेद दळवी यांचाही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे मुख्य लेखा अधिकारी तथा चौकशी अधिकारी काळीराम जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.