ठाणे - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्सच्या बी 6 इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार आणि सोसायटीच्या आतील सर्व सीसीटीव्ही फुटेजचे हार्ड डिस्क 2 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत कोणाला माहिती देवू नका, असे आवाहनही सोसायटीच्या पदधिकाऱ्यांना दिले. या घरी वाझे कुटुंबीय जाऊन येवून असतात, अशी माहिती या सोसायटीच्या सुरक्षा रक्षाकांनी दिली आहे. वाझे यांची अनेक घरे आहेत. त्यामुळे ते एका ठिकाणी नसतात, अशी माहितीही या सुरक्षांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
माध्यमांकडून समजली मृत्यूची बातमी -
मनसुख हिरेन यांचा मृत्यु झाला ही बातमी माध्यमांकडून समजली, अशी माहिती वाझे यांच्या पत्नी मोहिनी वाझे यांनी सांगितले आहे. याबाबत मीडियासमोर त्यांचे कुटुंब आले नसले तरी या भागात पोलिसांनी बंदेबस्त वाढवला आहे.
राबोड़ी पोलिसांनी ठणकावले -
सचिन वाझे हे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स हा भाग राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना वाझे यांना भेटायला कोणालाही गेटच्या आत मधे सोडू नका, असे आदेश राबोडी पोलिसांनी दिले आहेत.
हेही वाचा - 'खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्याची संधी देतंय का?'
वाझे 25 मार्चपर्यंत एनआयएच्या कोठडीत -
सचिन वाझेंना अटक केल्यानंतर त्यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं ही कोठडी ठोठावली आहे. NIA ने परिस्थितीजन्य पुरावे कोर्टात सादर केले. NIA ने म्हटलं, की "वाझे यांची चौकशी करण्यासाठी कोठडी गरजेची आहे, कारण या प्रकरणाचा तपास अजूनही प्राथमिक स्तरावर आहे. यात चेन ब्रेक करायची आहे. हा मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. यात इतर लोकं सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या लोकांची चौकशी होणं गरजेचं आहे."
सचिन वाझेंच्या वकिलांचा युक्तिवाद -
वाझे यांच्या वकिलांनी आपली बाजू कोर्टासमोर मांडताना त्यांच्याविरोधात कसलाही पुरावा नसल्याचा दावा केला. "एनआयएने फक्त संशयाच्या आधारावर त्यांना अटक केली आहे, त्यांच्या रिमांडमध्ये आरोपी विरोधात काही पुरावा नाही" असा युक्तिवाद वाझेंच्या वकिलांनी कोर्टात केला.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण : वझेंनंतर मुंबई पोलिसांतील आणखी काही अधिकाऱ्यांची होणार चौकशी?
12 तास चौकशीनंतर एनआयएकडून अटक -
एनआयएने शनिवारी 13 मार्च रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझेंना अटक केली. त्यापूर्वी जवळपास 12 तास त्यांची NIA ने चौकशी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 286, 465, 473, 506 (2), 120 ब आणि 4 (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे.