ठाणे - मोदी सरकारने केंद्रात मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार केला. यामध्ये भाजपचे भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांची 'पंचायत राज' खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर खासदार कपिल पाटलांच्या नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याची प्रतिक्रिया त्यांच्या घरातील महिला सदस्यांनी दिल्या आहेत. यावेळी एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड करण्यात आले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्या घरातील बच्चेकंपनी भलतीच खूश होती.
- काँग्रेसपासून राजकीय प्रवासाला सुरुवात -
सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या राजकीय प्रवासात त्यांना दोनवेळा पक्षांतर करावे लागले. १९८८ पासून काँगेसमधून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यावेळी पहिल्यांदा ग्रामपंचातच्या निवडणुकीत सहभाग घेऊन गावातील पदवीधर तरुण म्हणून थेट सरपंचपदी मजल मारली. त्यानंतर पंचायत समिती सभापती, तर १९९९ ला काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये भिवंडी तालुका अध्यक्ष म्हणून सुरुवात केली.
- 'पंचायत राज' विषयी दांडग्या अभ्यासामुळे केंद्रात मंत्रिपद -
१४ वर्ष राष्ट्रवादीमध्ये असताना ठाणे ग्रामीण भागात संपर्क वाढवला. यामुळे त्यांना फायदा होत ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष व ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदाची धुरा त्यांनी सांभाळली. याच दरम्यान त्यांच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष काळात यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत २०१० - २०११ आणि २०१२ या दोन वर्षात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त झाला. कालांतराने राष्ट्रवादी पक्षातील स्थानिक पातळीवरील अंतर्गत वादाला कंटाळून २०१४ साली भाजपमध्ये कपिल पाटील यांनी प्रवेश केला. त्यानंतर भिवंडी लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावून मोदी लाटेत पहिल्यांदाच ते खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर पुन्हा २०१९ मध्येही दुसऱ्यांदा लोकसभेवर जाण्याचा मान त्यांना मिळाला. खासदारकीच्या काळात त्यांनी प्रत्येक संसद अधिवेशनात मतदार संघातल्या नागरी प्रश्नांना वाचा फोडली. खास करून त्यांचा जिल्हा परिषदेत पंचायत राज विषयी असलेल्या दांडग्या अभ्यासामुळे त्यांना केंद्रात पंचायत राज खात्याची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
- तीन वर्षापासून होती मंत्रिपदाची अपेक्षा -
खासदार कपिल पाटील २०१९ ला दुसऱ्यांदा भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले, त्यावेळेपासूनच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची अपेक्षा खासदार पाटील बाळगून होते, अशीही माहिती त्यांच्या घरातील महिला सदस्यांनी दिली. आज मात्र आमची अपेक्षा पूर्ण झाल्याने पाटील कुटुंब खूपच आनंदित असल्याचेही त्यांच्या घरातल्या व्यक्तींनी सांगितले.