ठाणे : कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाला लागूनच असून या इराणी वस्तीतून आतापर्यंत शेकडो इराणी गुन्हेगारांना पोलिसांनी विविध गुन्ह्यात अटक केली आहे. मात्र तरीही इराणी वस्तीत गुन्हेगारांचा वावर असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात दुचाकी चोरी, धूमस्टाईलने सोनसाखळी, मोबाईल चोरी आणि घरफोडी करण्यात पटाईत असलेल्या इराणी गँगच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदारांनी नागरिकांचे धूम स्टाईलने सोनसाखळी, मोबाईल पळविण्याचा सपाट लावला होता.
सीसीटीव्ही आधारे आरोपीचा सुगावा : मीरा भाईंदर परिसरात गेल्या आठ दिवसात सहा ते सात ठिकाणी चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. एका घटनेतील सीसीटीव्ही फुटेज मीरा भाईंदर गुन्हे शाखेच्या हाती लागले. सदरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी अलीहसन आबु इराणी हा आंबिवली परिसरात असलेल्या इराणी वस्तीत राहणारा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
जंगलामध्ये काढला पळ: या माहितीच्या आधारे कल्याण शहरातील खडकपडा पोलिसांचे सात जणांच्या पथकाने मीरा भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकासह आंबिवली परिसरातील मधील इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्याचवेळी पोलीस आपल्या मागावर असल्याचे गुन्हेगार अलीहसन इराणीला कुणकुण लागताच त्याने घरातील खिडकीतून उडी मारून घराच्या काही अंतरावर असलेल्या जंगलामध्ये पळ काढला होता; मात्र सापळा रचून बसलेले पोलीस सावध होऊन फिल्मी स्टाईलने त्याचा पाठलाग करू लागले.
गुन्हेगार दलदलीत झोपला: आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी झाडाझुडपात चिखल अंगावर लावून तो दलदलीत झोपला होता. मात्र पोलिसांच्या नजरेतून गुन्हेगार निसटला नाही. पोलिसांनी दलदलीतच त्याच्या अंगावर झडप घातली असता दोघांमध्ये झटापटी झाली. गुन्हेगाराने एका पोलीस अंमलदाराचे तोंड चिखलाच्या दलदलीत खूपसून ठेवले होते. त्याचवेळी खडकपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय गायकवाड व त्यांच्या पथकाने तात्काळ चिखलात धाव घेतली. यानंतर त्या पोलीस अंमलदाराची गुन्हेगाराच्या तावडीतून सुटका करत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. तर खडकपाडा पोलीस ठाण्यात पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.