ठाणे - भिवंडीत कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी शहरात एकाच दिवसात कोरोनामुळे तब्बल 33 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर 40 नवे रुग्ण शहरात तर, ग्रामीण भागात 25 नवे रुग्ण आढळून आल्याने शहर व ग्रामीण परिसरात दिवसभरातील रुग्णाची संख्या एकूण 65 वर गेली आहे. कोरोनाबाधितांनी एक हजाराचा टप्पा ओलांडला असल्याने भिवंडीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
भिवंडी शहरात आतापर्यंत 727 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 272 रुग्ण बरे झाले आहेत. तर 58 रुग्णाचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 397 रुग्णावर सध्या स्थितीत विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत 321 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 116 रुग्ण बरे झाले आहेत. तर 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, 200 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी आढळलेल्या 65 नव्या रुग्णांमध्ये भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 1 हजार 48 पोहोचला असून त्यापैकी 388 रुग्ण बरे झाले आहेत. तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला असून 597 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले असून गुरुवारपासून पंधरा दिवसांचा लाकडाऊन महापालिकेने घोषित केला आहे. मात्र, महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या कोविड रुग्णालयांत रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने कोरोनाबाधितांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी केला आहे.