ठाणे- मोदी सरकारच्या मुक्त बाजार करारामुळे (आर.एस.सी.पी) देशभरातील लाखो यंत्रमाग कारखाने बंद पडून देशात प्रचंड आर्थिक मंदीची लाट येणार असल्याची शंका, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भिवंडीत व्यक्त केली आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून एमआयएमचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार खालील गुड्डू शेख यांच्या प्रचार सभे प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
खासदार ओवैसी पुढे म्हणाले की, यंत्रमाग व्यवसायाचे मूळ केंद्र असलेल्या भिवंडी शहराची आणि यंत्रमाग उद्योगाची आज दैनीय परिस्थिती झाली आहे. मात्र त्याकडे या सरकारचे लक्ष जात नाही. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाचा जीडीपी दर पाच टक्क्यांवर आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आर.एस.सी.पी करार करून चायना आणि इतर देशात स्वस्त मिळणारा फॅब्रिक कपडा देशात आणला जाईल. त्यामुळे भिवंडीसह देशभरातील लाखो यंत्रमाग कारखाने बंद पडून करोडो कामगार मोदींच्या राजवटीत बेरोजगार होणार असल्याची टीका ओवैसी यांनी केली आहे.
ओवैसी यांनी सभेदरम्यान सेना-भाजप सरकारवर चांगलाच निशाणा साधला
देशासह राज्यात अनेक समस्या असून भाजप सरकार केवळ देशप्रेम आणि कलम ३७० बद्दल बोलताना दिसत आहे. त्याचबरोबर, सरकारकडून देशातील तसेच राज्यातील मूळ समस्यांना बगल दिली जात असल्याचे ओवैसी यांनी आपल्या भाषणात सांगितले. दरम्यान भिवंडीतील दिवान शाह दर्गा परिसरात झालेल्या वर्षांच्या सभेच्या गतीचा अंदाज आयोजकांना व पोलिसांना आला नाही. त्यामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी, नागरिकांची गर्दी आणि दाटीवाटी झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरी करत नागरिकांना आपली वाट काढावी लागली. तर उशिराने सुरू झालेली जाहीर सभा आचारसंहितेच्या नियमामुळे रात्री दहा वाजता आटोपती घ्यावी लागली असल्याचे ओवैसी यांनी सांगितले.
हेही वाचा- दुरुस्तीवर लाखोंचा निधी खर्च; तरी केडीएमटीला प्रवाशांचा दे धक्का!