ठाणे - दुकानाचे शटर उचकटून सुमारे ९५ हजार रुपयांचे मोबाईल्स चोरल्याची घटना कळंबोलीत घडली. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रात्री उशीरा चोरट्यांनी हा कारनामा केला. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
दुकानमालक ढोबाराम चौधरी यांच्या तक्रारीनुसार कळंबोली बस डेपो समोरील चामुंडा मोबाईल शॉपमध्ये रात्री दीड ते पावणे दोनच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे सेंटर लॉत तोडून आत प्रवेश केला. दुकानात असलेले विविध कंपन्यांचे सुमारे ९५ हजार रुपयांचे मोबाइल अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत कपड्यामध्ये गुंडाळले आणि दुकानाचे शटर उघडे ठेवून पळून गेले. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले असले तरी या धाडसी चोरीचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
या दोन चोरट्यांनी नियोजनबद्धरीत्या रेकी करून ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. लवकरच गुन्ह्याचा छडा लावला जाईल, असा विश्वास वपोनी सतीश गायकवाड यांनी व्यक्त केला.