ठाणे/मुंबई : MNS Toll Plaza Burn : मनसैनिकांनी मुलुंड येथील टोलनाक्याच्या कार्यालयात पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केलाय. सोमवारी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. लहान वाहनांना टोल माफी दिली नाही तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर लगेच मनसैनिकांनी टोलनाका पेटवलाय.
राज ठाकरेंचा इशारा : मनसेचे कार्यकर्ते हे खळखट्याकसाठी प्रसिद्ध आहेत. माध्यमांसमोर राज ठाकरे एखादी गोष्ट बोलतात, त्यांचं बोलणं पूर्ण होईपर्यंत मनसेचे कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला त्यांच्या आदेशाला प्रतिसाद देण्यास तयार असतात. मग ते भोंगे लावणे असो की टोलनाके. टोल नाक्यांसदर्भात सरकारनं आपली भूमिका जाहीर करावी. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्यानुसार महाराष्ट्रात टोल नाक्यांवर लहान चार चाकी वाहनांना अडवलं जात आहे का? हे मनसेचे कार्यकर्ते पाहतील आणि तिथे जर दमदाटी होत असेल तर माझे कार्यकर्ते टोलनाके जाळतील, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर लगेचच अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांचा ताबा घेण्यास सुरुवात केली. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल येथील टोलनाक्यावर मनसेचे नेते योगेश चिले यांनी चार चाकी वाहनांना मोफत प्रवेश देण्यास सुरुवात केली.
मनसे कार्यकर्ते आक्रमक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान चार चाकी वाहनांना मोफत टोल प्रवेश असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, तरीदेखील सर्वच टोल नाक्यांवर चार चाकी वाहनांकडून टोल वसूल केला जात आहे. राज ठाकरे यांनी सांगितल्यानुसार मनसेचे कार्यकर्ते आता टोल नाक्यांवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार चार चाकी वाहनांना मोफत प्रवेश असल्यानं त्यांना मोफत सोडत आहेत. त्यामुळं टोल बूथवर काम करणारे कर्मचारी आणि मनसेचे कार्यकर्ते यांच्यात वादावादी देखील झाली.
मुलुंड येथील टोलनाका पेटवला : पनवेल येथील मनसेचे नेते योगेश चिले यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही टोल नाक्यांवर जाऊन सरकारला फक्त इशारा दिलाय. सरकारकडं आता दोन ते तीन दिवसांचा वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे काही म्हटलं आहे त्यानुसार, चार चाकी वाहनांना टोल माफी दिली पाहिजे. याची अंमलबजावणी या तीन दिवसांत नाही झाली तर राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे टोल नाक्यावर पुन्हा आंदोलन करू. तसेच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मुलुंड येथील टोल नाका पेटवण्याचा प्रयत्न केलाय.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis on Toll Plaza: टोलनाक्यावरुन फडणवीस यांची तब्बल आठ वर्षापूर्वीची माहिती देऊन सारवासारव; तर राज ठाकरे पुन्हा आक्रमक
- MNS Toll Protest : 'टोल'वरुन मनसे आक्रमक; कार्यकर्ते असेपर्यंत गाड्या सोडल्या फुकट अन् नंतर आकारले पैसे
- Actress Tejaswini Pandit Tweet: 'राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा'; अभिनेत्री तेजस्विनी पंडितची टोल आंदोलनात उडी