ठाणे - मागील काही दिवसापूर्वी मनसे आणि भाजपमध्ये ठाण्यात आंबा स्टॉलवरुन वाद झाला होता. त्यानंतर मनसेने विविध मागण्यांसाठी ठाण्यात शेतकऱ्यांचा महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात 5 ते 10 हजार शेतकरी सहभागी होतील असा दावाही मनसेने केला होता. परंतु, शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चात हा दावा फोल ठरल्याचे पाहायला मिळाले. या मोर्चात राज्यभरातून जवळपास 100 च्या आसपासच शेतकरी आले होते. परंतु त्यामध्ये मनसेचे पदाधिकारीच जास्त प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा मोर्चा शेतकऱ्यांचा की मनसेचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला.
मागील आठवड्यात ठाण्यात शेतकऱयाच्या आंबा स्टॉलच्या मुद्यावरुन मनसे आणि भाजपचे पदाधिकारी आपसात भिडले होते. त्यानंतर हा वाद शमेल अशी शक्यता वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात मनसेने ठाण्यात शेतकऱयांचा महामोर्चा काढण्याचे निश्चित केले. त्यानुसार शुक्रवारी दुपारी एक वाजता गावदेवी मैदानाजवळून हा मोर्चा निघणार होता. परंतु शेतकरी आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात वेळ गेल्याने हा मोर्चा 2.30 वाजताच्या सुमारास निघाला. या मोर्चाला सुरवात झाली, यावेळी बैलगाड्यांसह डोक्यावर भाजीच्या टोपल्या घेऊन शेतकऱ्यांसह मनसेचे पदाधिकारी चौकीदार चोर हैं, च्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.
या मोर्चात राज्यभरातून 5 ते 10 हजार शेतकरी सहभागी होतील, असा दावा मनसेने केला होता. परंतु प्रत्यक्षात 100 च्या आसपास शेतकरी यात सहभागी झाल्याचे दिसून आले. मात्र, मोर्चात 90 टक्के शेतकरी सहभागी असल्याचा दावा यावेळी मनसेचे ठाणे शहरअध्यक्ष रविंद्र मोरे यांनी केला.
या मोर्चात राज्यातील बीड, परभणी, मराठवाडा आदी भागातील शेतकरी सहभागी झाले होते. याशिवाय या मोर्चात बीडमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱयांची 10 कुटुंबे सहभागी झाले होते. शेतीला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात, आघाडीच्या काळात शेतमालाला जो बाजारभाव मिळत होता, तो भाजप सरकारच्या काळात मात्र मिळू शकला नसल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.