ठाणे - लॉकडाऊनमुळे आधीच महिनाभर ऑनड्युटी असलेल्या ठाणे पालिकेच्या अत्यावश्यक विभागातील सर्वच कर्मचार्यांचा ५० लाखांचा विमा तातडीने उतरवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी प्रशासनाकडे केली. तसेच दर १४ दिवसांनी या कर्मचार्यांची विनामूल्य कोरोना चाचणी करावी, अशी विनंतीही प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोनाशी लढा देताना ठाण्यातील प्रत्येक अत्यावश्यक विभागातील कर्मचारी झटत आहे. या काळात त्यांच्या जीवावर हा आजार बेतू शकतो. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत येणार्या खुद्द ठाणे पालिका आयुक्तांसह पालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी, परिवहन सेवा, सफाई कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस, पञकार, अग्निशमन दल, सुरक्षा कर्मचारी, पाणी विभाग, फायलेरिया आदींच्या कर्मचार्यांचा ५० लाखांचा विमा उतरवावा. या विभागात काम करणारे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांशी वारंवार संर्पकात येतात. त्यामुळे त्यांची दर १४ दिवसांनी कोरोना चाचणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
दुर्धर आजारांशी लढणार्या कर्मचार्यांना सक्तीची रजा द्या, ह्रदयरोग, दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी व्याधींचा सामना करणार्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना सक्तीची भरपगारी रजा प्रशासनाने द्यावी. तसेच ५५ वर्षांवरील कर्मचार्यांनादेखील घरीच थांबविण्याची मागणी संदीप पाचंगे यांनी प्रशासनाला केली आहे.