ठाणे : मुंबईतील फुटपाथवर राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या आस्मा शेखच्या यशाची बातमी समजल्यानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. कठीण परिस्थितीवर मात करत आस्माने दहावीमध्ये यश संपादन केले असून, तिला पुढेही शिक्षण सुरू ठेवण्याची इच्छा आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करण्यासह, तिला राज्य सरकारकडून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
काल दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, ९५ ते १०० टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी पहायला मिळत आहेत. मात्र, मुंबईच्या फुटपाथवर राहून, कठीण परिस्थितीत संघर्ष करून दहावीला ४० टक्के मिळवणाऱ्या आस्मा शेखचे यश अधिक लक्षवेधी आहे. त्यामुळे तिचे सगळीकडे कौतुक होत आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी तिला फोन करून तिचे विशेष कौतुक केले. तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी प्रताप सरनाईक यांनी दाखवली. मात्र, त्याआधीच आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेने तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचे आस्माने सांगितले.
आम्हाला हक्काचे घर हवे असल्याची इच्छा आस्माने सरनाईक यांच्याशी बोलताना व्यक्त केली. त्यावर आपण राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तसेच गृह निर्माण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून एमएमआरडीए किंवा म्हाडा कडून आस्माला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सरनाईक म्हणाले. तसेच कॉलेज करून पार्टटाइम जॉब करायचा असेल तर मुंबईत फोर्ट भागात नोकरी मिळवून देण्याचा शब्दही सरनाईक यांनी तिला दिला.
रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या अनेक नागरिकांना एमएमआरडीएच्या योजनेत घरे देण्यात आली आहेत. त्याचपद्धतीने कठीण परिस्थितीत संघर्ष करून यश मिळविणाऱ्या व सर्वांपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या आस्मा शेख हिला राज्य सरकारकडून घर मिळवून देण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
फुटपाथवर राहणाऱ्या आस्माचे वडील लिंबू सरबत विकण्याचा व्यवसाय करतात. तिच्या या संघर्षातून सर्व सुखसोयी असतानाही कुरकुर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी धडा घेण्याची गरज आहे. रस्त्यावर राहणाऱ्या आस्माचे ४० टक्के निश्चितच सर्वसाधारण विद्यार्थ्याच्या ९० टक्क्यांहून कमी नाही. तिला मार्क्स किती मिळालेत हे महत्वाचे नाही, तर या परिस्थितीतही शिक्षण घेण्याची जिद्द तिने मनात कायम ठेवली हे महत्वाचे आहे. रस्त्यावर लिंबू सरबत विकणाऱ्या आपल्या वडिलांना फुटपाथवरून स्वतःच्या घरात न्यायचे तिचे स्वप्न आहे. त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू, असा शब्द सरनाईक यांनी दिला आहे.
हेही वाचा : मुंबईच्या आस्माची हजारो ख्वाहिशे ऐसी...फुटपाथवर राहून दहावीत मिळवले यश