नवी मुंबई - नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्र एकवटले आहेत. ‘दिबां’ची अस्मिता जपण्यासाठी सर्व भेद बाजूला करून सज्ज झाले आहेत. मात्र, दुसरीकडे शिवसेनाही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे म्हणून हट्टाला पेटली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव द्यावे यासाठी शिवसेनाही रस्त्यावर उतरेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री जर असे वडिलांचे नाव द्यावे म्हणून आग्रह धरत असतील तर या महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे वक्तव्य पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे
आम्हाला अडवायचा प्रयत्न केल्यास आम्ही आत्मदहनाची वेळ आली तरी मागे हटणार नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून 24 जूनला कृती समिती रस्त्यावर उतरणार आहे. प्रशांत ठाकूर, महेश बालदी व गणपत गायकवाड या तिन्ही आमदारांनी पोलीस आयुक्तांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्ही आंदोलनस्थळी जाणारच आणि तुम्ही जाऊ दिले नाही, तर रस्त्यात जे काही होईल त्यास शासन व पोलीस जबाबदार असतील, असेही ठणकावले आहे. ठाकरे सरकारच्या भूमिकेमुळे लोक चिडलेली असून दिबांच्या नावासाठी जनता रस्त्यावर उतरणार आहे, आणि दिबांच्या नावासाठी आम्ही केंद्रातही जाणार आहोत, असेही त्यांनी अधोरेखित केले.
मुख्यमंत्री धमकी देतात हा लोकनेते दि.बा. पाटील व त्यांच्या कार्याचा अपमान
24 जूनचे आंदोलन करायचे हा निर्धार पक्का आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांना तुम्ही आंदोलन करत असाल, तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, अशी भाषा केली. अशा प्रकारे मुख्यमंत्री धमकी देतात हा लोकनेते दि.बा. पाटील व त्यांच्या कार्याचा अपमान आहे. तसेच खुद्द मुख्यमंत्री जर स्वतःच्या वडिलांच्या नावाचा आग्रह धरत असतील तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला आमचा पाठिंबा, राज ठाकरेंची भूमिका
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रशांत ठाकूर यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देत असाल तर आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका मांडली आहे.
घेराव आंदोलनातून महाराष्ट्र सरकारची झोप उडविण्यासाठी सज्ज राहा - आमदार महेश बालदी
सर्वपक्षीय कृती समितीत जे ठरेल ते निर्देश आपल्याला पाळायचे आहेत. पोलिसांनी आंदोलनाला जाऊ नका, गुन्हे दाखल होतील, असे म्हटले आहे. पण, दि.बा. पाटील यांच्यामुळे आपल्याला चांगले दिवस दिसले. म्हणूनच घेराव आंदोलनातून महाराष्ट्र सरकारची झोप उडविण्यासाठी सज्ज राहा वक्तव्य उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले आहे.