मीरा भाईंदर (ठाणे) : मीरा भाईंदर शहरात आज बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दिव्य दर्शन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला एक लाखांपेक्षा अधिक भक्तांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच काँग्रेस तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याकडून विरोध झाल्यानंतर मिरारोड पोलीस ठाण्यातून आयोजक यांना सीआरपीसी 149 ची नोटीस देण्यात आली आहे.
नोटीसमध्ये काय म्हटलंय? : पोलिसांच्या या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या अगोदरच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा पसरवणे, आर्थिक मानसिक शोषण करणे चमत्कार करत असल्याचा दावा हे सर्व करून लोकांची दिशाभूल व फसवणूक करत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच भक्तांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीचे उल्लंघन झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
दिव्य दर्शनाचा कार्यक्रम आयोजित : संपूर्ण देशभरात चर्चेत असलेले बागेश्वर धाम सरकार मध्य प्रदेश येथील धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे दोन दिवस मुंबईमध्ये दिव्य दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मीरारोड पूर्वेच्या सेंट्रल पार्क मैदानमध्ये आज आणि उद्या दोन दिवस धिरेंद्र शास्त्री महाराज दिव्य दर्शन देणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक मीरा-भाईंदर विधानसभेच्या आमदार गीता जैन असून, या कार्यक्रमाला विरोध होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देऊन कार्यक्रमास रद्द करण्याची मागणी केली आहे. यावरून राज्यभरातून वारकरी संप्रदाय, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विरोध होत आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : आयोजकांकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भक्तांना बसण्यासाठी 5000 गाद्या तसेच चार प्रवेशद्वार मैदानाला देण्यात आले आहे. सकाळपासून मैदानाजवळ भक्तांची गर्दी वाढत आहे. वादग्रस्त ठरलेल्या बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये तीन डीसीपी, 15 अधिकारी, 1 सीआरपी पथक, 1 एस.आर.पी. एफ पथक 80 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी असणार आहेत.