मीरा भाईंदर (ठाणे) - मीरारोडच्या नयानगर परिसरात रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे पालिकेतर्फे जेसीबीच्या सहायाने फेरीवाल्यांच्या हातगाड्या तोडत कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
शहराला फेरीवाल्यांचा विळखा -
मीरा भाईंदर महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात करोडो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवले जात आहेत. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी गॅरेजची वाहने, तर काही ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात. मीरारोडच्या नयानगर भागात तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली आहेत. तसेच काही फेरीवाले हे हातगाड्या लावून व्यवसाय करत आहेत. याठिकाणी भाजीपाला, फळे, कपडे यासह इतर वस्तू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात असून अनेक जण मास्क न घालता वावरत असतात.
जेसीबीच्या मदतीने तोडल्या हातगाड्या -
फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते; परंतु दोन चार दिवसांनंतर तीच परिस्थिती निर्माण होते व पुन्हा कारवाई केली जात नाही. बुधवारी पालिकेकडून फेरीवाल्याच्या हातगाड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. यावेळी जवळपास २०० हातगाड्या तोडण्यात आल्या.