ठाणे: मिरा-भाईंदर शहरात पाणी टंचाईमुळे भाजपा आणि काँग्रेस पक्षात राजकीय वाद निर्माण झाला आहे. महापौरांच्या वक्तव्याचा वापर करत काँग्रेस युवक कार्यकर्त्यांनी चक्क कामावर ठेवण्यासाठी महापौरांना नोकरीचा अर्ज दिले.
मिरा-भाईंदर शहराला एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील २५ दसलक्ष घनलीटर पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. भाजपाने जनतेची दिशाभूल केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यात युवक काँग्रेस मिरा भाईंदर अध्यक्ष दीप काकडे यांनी 'महापौर झोपल्या आहेत का?' असा प्रश्न केला होता. त्याला उत्तर देताना महापौर जोत्सना हसनाळे यांनी दीप काकडेला पालिकेत सुरक्षा रक्षकाची नोकरी देणार असल्याचे वक्तव्य केले होते.
त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शंभर नोकरी अर्ज महापौरांना दिले. यावेळी पालिकेमध्ये काहीसे हास्यास्पद दृश्य निर्माण झाले होते.