मीरा भाईंदर (ठाणे) - अपक्ष आमदार गीता जैन यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक भाजपा नेतृत्वावर हल्लाबोल केला होता. त्याला प्रतिउत्तर देत बुधवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी गीता जैन यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असे गेल्या तीन वर्षांपासून सरनाईक बोलत आहेत. मग हिंमत असेल तर चौकशी लावा. सरकार तुमचे आहे. मात्र, चौकशी का करत नाही, असे भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे म्हणाले.
प्रभाग समितीवर महाविकास आघाडीचा दावा फोल ठरला. मीरा भाईंदर महानगरपालिकेल्या सर्व प्रभाग समिती सभापतीवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहे. तसेच आमदार गीता जैन यांना 4 ऑक्टोबरला भाजपातून निलंबित करण्यात आले होते. त्यांनी भाजपासोबत बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. निवडून आल्यानंतर राज्यात भाजपाला समर्थन दिले. मात्र, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला मतदान केले. पक्षाविरोधात मतदान केल्यामुळे भाजपा गटनेते हसमुख गेहलोत यांनी कोकण आयुक्तांकडे गीता जैन यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
गीता जैन महापौर असताना पर्युषण सणात मांसाहार आणि शाकाहारी वाद चव्हाट्यावर आला होता. शिवसेना-भाजपामध्ये मोठा वाद झाला होता. मग आता शिवसेनेसोबत कसे जमले, असा सवालही त्यांनी केला. जैन यांच्यासोबत काही भाजपा नगरसेवक होते. मात्र, प्रभाग समितीच्या निवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवारांना मतदान केले. याचा अर्थ ते सर्व नगरसेवक भाजपामध्ये आहेत.
दरम्यान, गीता जैन शहराच्या भाजपाच्या महापौर होत्या. त्यावेळी तत्कालीन भाजपा सरकारने 100 कोटी रुपये नाले-गटारसाठी दिले. मग तेव्हा विकास नाही झाला का? असा प्रतिप्रश्न म्हात्रे यांनी विचारला. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जर महानगरपालिकामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असे आमदार सरनाईक म्हणत आहेत तर सरकार त्यांचेच आहेत. चौकशी लावा. सत्य काय आहे ते जनतेसमोर येईल, असे भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे म्हणाले.