मीरा भाईंदर (ठाणे) - कोरोनामुळे आर्थिक स्थिती नाजूक असतानादेखील पालिका प्रशासनाने १,८८९ अधिकारी कर्मचारी तसेच स्थायी अस्थायी कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज घेतला आहे. महापौर जोस्ना हसनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सानुग्रह अनुदान मध्ये ३ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीला उपमहापौर हसमुख गेहलोत, स्थायी समिती सभापती अशोक तिवारी,सभागृह नेते प्रशांत दळवी, विरोधी पक्षनेते प्रविण पाटील, डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, उपयुक्त अजित मुठे, लेखापरीक्षक शरद बेलवटे, आस्थापना अधिकारी सुनील यादव उपस्थित होते.
आस्थापनेवरील वर्ग 1 ते 4 संवर्गातील कर्मचारी वर्गांना प्रत्येकी 22,470 रूपये तर संगणक चालक आणि लघुलेखक यांना प्रत्येकी 17,302 रूपये यासह विविध संवर्गातील अस्थायी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्गवारीनुसार सानुग्रह अनुदान दिवाळीपुर्वी देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची वसुली यावेळी साधारणत: 50 टक्के इतकीच आजतागायत झालेली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करीत महापालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्ताने सानुग्रह अनुदान मिळणार की नाही यासंदर्भात महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
कोरोनामुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता त्यांना सानुग्रह अनुदानात यंदा वाढ न देता मागील वर्षी देण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाच्या धर्तीवरच यंदाही दिवाळीची भेट देण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीत केली होती. सदर मागणी एकमताने मान्य करण्यात आल्याचे महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी जाहीर केले. मिरा-भाईंदर महानगरपालिकेत 1889 अधिकारी, कर्मचारी तथा अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी यंदाच्या वर्षी 3.62 लाख रूपये या बैठकीत मंजूर करण्यात आलेले आहेत. गतवर्षी याच कर्मचाऱ्यांना 3.67 लाख रूपये इतके मंजूर करण्यात आलेले होते. यंदा प्राथमिक शिक्षक आणि शिक्षण अभियानातील शालेय पोषण कर्मचारी वर्गांकरीता 38 लाख 45 हजार रूपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. दिवाळीपुर्वी सानुग्रह अनुदानाची रक्कम सर्व कर्मचारी वर्गांना मिळणार असल्याने कर्मचारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.